(मुंबई)
ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढल्या नाहीत, तर प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणारे आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेने २८ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, १ ऑक्टोबरपासून मुंबईतील परिवहन मंडळाच्या मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन केले जाईल, असे जाहीर केले आहे.
संघटनेने स्पष्ट केले की, शासनाने वेळेत मागण्यांवर निर्णय घेतला नाही, तर उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी सरकारवर राहील. तसेच आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
- २००६ पासून शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करणे.
- २०१६ पासून थकीत घरभाडे, भत्ते व महागाई भत्ता देणे.
- सातवा वेतन आयोग लागू करणे.
- दिवाळी बोनस २०,००० रुपये देणे.
- आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ८.५ लाखांची मदत देणे.
- संप काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणे.
- रिक्त पदांवर नवीन भरती करणे.
- खासगी बस न घेता महामंडळाच्या स्वत:च्या बस वापरणे.
- महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे ४३% प्रमाणात देणे.
- २०१५ पासून झालेली प्रवासभाडे वाढ पूर्वलक्षीपणे लागू करणे.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देणे.
- महामंडळाची स्थावर मालमत्ता उद्योगयोग्यतेच्या धर्तीवर चालवणे किंवा शासनात विलीन करणे.
संघटनेचे म्हणणे आहे की, मागण्यांवर तोडगा न निघाल्यास संपूर्ण राज्यभर एसटी कर्मचारी आंदोलनाच्या मार्गावर उतरणार असून, ऐन सणासुदीसह दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागेल.

