(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरात असलेल्या मच्छी मार्केट येथे व्यवसाय करणाऱ्या एका ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक उलट्यांचा तीव्र त्रास झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशरफ अब्दुलहमीद झारी (वय ५८, रा. फातिमा अपार्टमेंट, रूम नं. ११, बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी १ मार्च रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अशरफ झारी हे मच्छी मार्केटमधील आपल्या ‘वेलकम हलाल चिकन सेंटर’ या दुकानात बसले होते. त्यावेळी त्यांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती बरी नसल्याचे लक्षात येताच, “मला त्रास होत आहे, मी उपचारासाठी दवाखान्यात जातो,” असे सांगून त्यांनी दुकानातील कामगार अनंत कांबळे यांच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवली आणि ते घरी निघून गेले.
घरी गेल्यानंतर त्यांचा उलट्यांचा त्रास अधिकच वाढला. प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून त्यांचा मुलगा मन्नान झारी आणि पत्नी यांनी त्यांना तातडीने सकाळी ७.४५ वाजता जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर सकाळी ८.३० वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २५/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत करण्यात आली आहे. याप्रकरणी मन्नान झारी यांनी पोलिसांना खबर दिली असून पुढील तपास सुरू आहे.

