(बंगळुरू)
देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या बंगळुरू येथील कॅम्पसमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीत कार्यरत असलेल्या एका पुरुष कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये सुमारे ३० महिला सहकाऱ्यांचे वॉशरूममधील व्हिडीओ आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सावलीमुळे उघड झाला प्रकार
३० जून २०२५ रोजी, इन्फोसिसच्या इलेक्ट्रॉनिक सिटी कॅम्पसमधील एका महिला कर्मचाऱ्याला वॉशरूममध्ये प्रवेश करताना एक संशयास्पद सावली दिसली. तिला आपला व्हिडीओ शूट केला जात आहे असा संशय आल्याने तिने तत्काळ आरडाओरडा केला. सुरुवातीला तिला एक संशयास्पद प्रतिबिंब दिसले आणि शेजारच्या स्टॉलमधून तिला हालचाल जाणवली. काही क्षणांनंतर, ती तपासणी करण्यासाठी कमोडवर उभी राहिली आणि शेजारच्या स्टॉलमध्ये कमोडवर एक माणूस उभा असल्याचे पाहून तिला धक्का बसला, ज्याची नंतर ओळख स्वप्नील नागेश माळी (वय २८) म्हणून झाली, जो ती शौचालयात असताना त्याच्या मोबाईल फोनने तिचा व्हिडिओ बनवत होता.
घाबरून पीडिता वॉशरूममधून बाहेर पळत सुटली आणि ऑफिसमधील इतरांना सावध करण्यासाठी ओरडली. महिलेचा मोठा आवाज ऐकून जवळील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक धावून आले. तो मूळचा आंध्र प्रदेशचा असून, इन्फोसिसचा कर्मचारी म्हणून कार्यरत होता. तो घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कर्मचार्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना ३० जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता इन्फोसिस कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील आय-क्यू-ई विंगमध्ये घडली.
मोबाईलमधून आढळले ३० हून अधिक व्हिडीओ क्लिप्स
संस्थेच्या एचआर विभागाने आरोपीचा मोबाईल तपासल्यानंतर, त्यामध्ये ३० पेक्षा अधिक महिला सहकाऱ्यांचे वॉशरूममधील व्हिडीओ असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये भीती, अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेवर झालेल्या या गंभीर आघातामुळे अनेकांनी कंपनीतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिसांकडून तत्काळ कारवाई
पीडित महिलेने ही घटना आपल्या पतीला सांगितली आणि त्याच्या सल्ल्यानुसार तिने १ जुलै रोजी इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत स्वप्नील माळीला अटक केली. या प्रकरणी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांखाली, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (IT Act) तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे कंपनीतील एचआर व अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. इन्फोसिससारख्या नामवंत कंपनीच्या कॅम्पसमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेचा भंग होणे ही अत्यंत चिंताजनक आणि धोकादायक बाब आहे. कंपनी कॅम्पसमधील वॉशरूममध्ये छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने व्हिडीओ शूट करणाऱ्या आरोपी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार केवळ कंपनीसाठी नव्हे, तर आयटी क्षेत्रातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर इशारा आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.