(रायपूर)
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या चिथावणीखोर विधानावरून रायपूरमधील माना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार गोपाल सामन्थो आणि अंजना गैन या दोन नागरिकांनी दाखल केली असून, त्यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण?
गुरुवारी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्या म्हणाल्या, “जर अमित शाह बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबवू शकले नाहीत, तर त्यांचं डोकं कापून टेबलावर ठेवा.” हे विधान प्रसारमाध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला.
तक्रारीत काय म्हटलं आहे?
तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “एखाद्या खासदाराने असं विधान करणं केवळ लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का नाही, तर समाजात अराजकता आणि अस्थैर्य निर्माण करणारे आहे. हे विधान देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करत असून, असामाजिक घटकांना प्रोत्साहन देणारं आहे.” त्यांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली असून, महुआ मोईत्रा यांच्याविरोधात BNS (भारतीय न्याय संहिता) च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, असं तक्रारीत नमूद आहे.
कोणती कलमे लागू?
माना पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 196 – धर्म, जात, भाषा, जन्मस्थान आदींच्या आधारावर शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न, कलम 197 – द्वेष निर्माण करणारे किंवा समाजातील शांतता भंग करणारे विधान, कलम 109 – इतर व्यक्तीला गुन्हा करण्यास उद्युक्त करणे ही कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय इतर संबंधित कलमांचाही अंतर्भाव केला जाऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

