(रत्नागिरी / प्रतिनिधी)
परदेशातील मैत्री, मदतीचे आश्वासन आणि आर्थिक व्यवहारांचे आमिष दाखवत रत्नागिरीतील एका व्यक्तीची तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात युनायटेड किंगडममधील टिआगो फौरा या नागरिकासह दिल्लीतील स्वतःला पासपोर्ट-इमिग्रेशन अधिकारी म्हणून भासवणाऱ्या प्रिया शर्मा हिच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यमनगर परिसरातील पडवेकर कॉलनी येथे राहणारे सलील अब्दुल कादीर काझी यांची एका ऑनलाईन संकेतस्थळाच्या माध्यमातून टिआगो फौरा याच्याशी ओळख झाली. २२ जुलै २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपीने विश्वास संपादन करत आर्थिक व्यवहारांची साखळी उभी केली.
दरम्यान, स्वतःकडे ६० हजार यूके पाउंड आणि सोने बाळगल्याप्रकरणी दिल्ली इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतल्याचा बनाव आरोपीने केला. ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी आणि कथित अडचणीतून सुटका करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. या कथित प्रक्रियेसाठी ‘प्रिया शर्मा’ नावाच्या महिलेने दिल्ली येथील पासपोर्ट-इमिग्रेशन कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवत फिर्यादीशी संपर्क साधला. आरोपींकडून रक्कम लवकरच परत करण्याचे आश्वासन दिल्याने फिर्यादी काझी यांनी आपल्या आयसीआयसीआय आणि एचएसबीसी बँक खात्यांमधून वेळोवेळी एकूण २२ लाख २१ हजार ४०० रुपये विविध व्यवहारांद्वारे पाठवले. मात्र, ठरल्याप्रमाणे रक्कम परत न आल्याने आणि संपर्कही तुटल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
याप्रकरणी पोलिसांनी टिआगो फौरा व प्रिया शर्मा यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, परदेशातून कार्यरत सायबर फसवणूक रॅकेटचा धागा उलगडण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा प्रयत्नशील आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी अत्यंत सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

