(पुणे)
पुण्याच्या उंड्री भागातील मार्वल आयडियल स्पेसीओ सोसायटीत शुक्रवारी (26 सप्टेंबर) दुपारी सुमारे अडीच वाजता आग लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आग आटोक्यात आणताना दोन गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने अग्निशमन दलाचे दोन जवान आणि सात नागरिक जखमी झाले आहेत. मृत मुलाचे नाव तर्ष कमल खेतान, वय 15 वर्ष, रा. मार्वल आयडियल स्पेसीओ सोसायटी, उंड्री, असे आहे.
जखमींमध्ये कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे विश्वजित मधुकर वाघ, पृथ्वीराज परमेश्वर खेडकर, तसेच सोसायटीतील रहिवासी डॉ. मृणाल मयंक (42), योगेश गिरीधर जाधव (45), झिशान साहिल खान (35), सुरक्षारक्षक विनोद मोहन लिमकर (32) आणि अन्य तीन नागरिकांचा समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
कोंढवा खुर्द अग्निशमन दलाचे अधिकारी समीर शेख यांच्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बाराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घरात तर्ष एकटा झोपलेला होता, तर आई-वडील कामावर गेलेले होते. आगीने जोर धरला आणि खिडक्यांमधून आगीचे लोळ दिसू लागले. सोसायटीतील नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाला माहिती दिली. दरम्यान, तर्षच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान व काही नागरिक फ्लॅटमध्ये प्रवेश करून पाण्याचा फवारा चालवण्याचा प्रयत्न करत असताना किचनमधील दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे तेथील काही जण फेकले गेले, पण अन्य जवानांनी पाण्याचा फवारा चालू ठेवला
फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर तर्ष गंभीर जखमी अवस्थेत आढळला. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू घोषित केला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग पूर्णपणे आटोक्यात आणली. घटनास्थळी पाच अग्निशमन बंब, एक बीएसेट व्हॅन, दोन टँकर आणि एक उंच शिडीचे वाहन वापरले गेले.
पोलिसांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात आग लागल्याची नोंद केली आहे.

