( साखरपा / भरत माने )
कोकण आणि शिमगा यांचे नाते अतूट आहे. होळी उत्सवाला सुरुवात होताच चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल झाले असून संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामदेवतांच्या पालख्या घराघरांत जाण्यास बाहेर पडल्या असून, आपल्या देवाची पालखी नाचवण्याचा आनंद प्रत्येक भाविकासाठी खास असतो.
याच पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर मतदारसंघाचे किरण (भैया) सामंत यांनी साखरपा येथे आयोजित पालखी सोहळ्यात पारंपरिक उत्साहात सहभाग घेतला. स्थानिक उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी स्वतः भक्तिभावाने पालखी उचलून नाचवत भाविकांमध्ये जल्लोष निर्माण केला. नेहमी राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय असणारे आमदार सामंत शिमगा उत्सवातही अग्रभागी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
या वेळी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. आमदार सामंत यांनी यावेळी परंपरा आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. अशा सोहळ्यांमधून समाजात एकोपा आणि सद्भावना अधिक बळकट होते.”
स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या या सहभागाचे मनापासून स्वागत केले. या पालखी सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाची भावना व्यक्त होत आहे.

