(गुहागर / सचिन कुळये)
परदेशात कोकणची लोकसंस्कृती, नमन परंपरा आणि शिवभक्ती जपणाऱ्या फॉरेन रिटर्न शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळाचा विशेष सत्कार सोहळा कडवई (किंजळकर–धुळप वाडी) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कडवई येथील वार्षिक होळीच्या सार्वजनिक पूजेच्या निमित्ताने दिनांक १ मार्च २०२६ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यास सर्व ग्रामस्थ, मान्यवर आणि लोककलेचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परदेशात राहूनही कोकणची ओळख, लोककला आणि नमन परंपरा जपणाऱ्या कलाकारांचा सन्मान करताना ग्रामस्थांनी अभिमान आणि आपुलकी व्यक्त केली.
कार्यक्रमाला वाडीप्रमुख संजय किंजळकर व सुभाष धुळप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. अपर्णा जाधव तसेच लोककला व तरुणांसाठी नेहमीच पाठबळ देणारे अरविंद जाधव यांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन प्राध्यापक किंजळकर यांनी केले. त्यांच्या समालोचनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच रंगतदार ठरला.
शिवभक्त या लोकनाट्याचे निर्माते श्री. युयुत्सु आर्ते, सहनिर्माते परेश देवरुखकर, दिग्दर्शक निलेश किंजळकर यांच्यासह कलाकार केतन किंजळकर, वैभव पडये, मदन पांडव, अनिल किंजळकर, प्रणित काकवल, प्रमोद करंडे आदी शिवभक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी कलाकारांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “कडवई ग्रामस्थांनी दिलेला प्रेमळ सन्मान आमच्या परदेशातील सांस्कृतिक प्रवासाला नवी ऊर्जा देणारा आहे. हा जिव्हाळा आणि पाठबळ आम्हाला पुढील वाटचालीस प्रेरणा देणारे आहे.” कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी कडवई ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

