(मुंबई)
मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचला होता. उपोषणाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य करत हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा शासन निर्णय जारी केला.
या निर्णयानुसार, हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदी आणि पुराव्यांच्या आधारे मराठवाड्यातील ‘कुणबी मराठ्या’ना ओबीसी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर ५० मराठा समाज बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. हे प्रमाणपत्र आज हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
प्रक्रिया कशी आहे?
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार, त्रिसदस्यीय ग्रामस्तरीय समितीकडून पडताळणी करूनच जात प्रमाणपत्र दिले जात आहे. ज्या अर्जदाराकडे १९६७ पूर्वीचा पुरावा आहे किंवा ज्याच्याकडे तो नसेल, त्यांनी संबंधित गावात वास्तव्य व शेतीचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर जबाब घेऊन आणि चौकशी करून प्रमाणपत्र देण्यात येते.

