( खेड )
खेड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भरणे नाका परिसरात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.
धडकेत दुचाकीस्वार कंटेनरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा मृत्यू अत्यंत भयावह स्वरूपाचा झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृत दुचाकीस्वाराचे नाव शांताराम गोरीविले असे असून, त्याच्यासोबत असलेला शांताराम तांबट गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भरणे नाका परिसरातील रस्ता अपूर्ण आणि अरुंद असल्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. उड्डाणपुलाखाली वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने चालवतात, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन देखील सर्रास घडते. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी जवळच पोलिस चौकी असली तरी कोणताही कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हता.
या अपघातामुळे पुन्हा एकदा भरणे नाका येथील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिक नियंत्रणाचा अभाव या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अपघातांचा वाढता धोका रोखावा, अशी मागणी केली आहे.

