(खेड-रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील ऐनवली परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये चक्क अल्पवयीन विवाहित बालिका आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, खेड पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐनवली येथील संबंधित वीटभट्टीवर परजिल्हा तसेच परराज्यातून आलेले मजूर वास्तव्यास असून तेथे काम करत आहेत. या मजूरवस्तीमध्ये दोन विवाहित अल्पवयीन जोडपी वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. काही कारणास्तव या अल्पवयीन मुलींना तपासणीसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलींचे वय १८ वर्षांखाली असल्याचे निष्पन्न होताच पुढील कारवाईसाठी पोलिसांना कळवले. रुग्णालयाकडून माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात या अल्पवयीन मुलींचे विवाह झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हे मजूर नेमके कोणत्या जिल्ह्यातील किंवा राज्यातील आहेत, या बालिकांचे विवाह कधी आणि कुठे झाले, तसेच संबंधित वीटभट्टी मालकाने या कामगारांची अधिकृत नोंदणी केली होती की नाही, याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वीटभट्टी मालकासह तेथे काम करणाऱ्या मजुरांची कसून चौकशी सुरू केली आहे. कामगारांची ओळखपत्रे तपासण्यात आली होती का, बालविवाहाबाबत कोणाची भूमिका होती, याचा तपासही करण्यात येत आहे. बालविवाह हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत पोलिसांनी दिले आहेत. या घटनेमुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीवरही चर्चा रंगू लागली आहे.

