(संगमेश्वर / प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथे जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा संगमेश्वर (संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित) येथील विद्यार्थी कुमार समर्थ निलेश मिस्त्री (इयत्ता अकरावी, विज्ञान शाखा) याने उल्लेखनीय यश संपादन केले.
१७ वर्षांखालील गटात समर्थ मिस्त्री याने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावत आपली ताकद सिद्ध केली. त्यानंतर त्याची निवड विभागस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली आहे. एवढेच नव्हे तर रत्नागिरी जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन आयोजित २०२५-२६ च्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावत त्याने राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. या यशामागे विद्यालयाचे प्राचार्य एच. जी. शेख, पर्यवेक्षक एस. ए. पटेल यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच क्रीडा शिक्षक आर. एच. तांबोळी यांचे विशेष प्रयत्न महत्त्वाचे ठरले.
संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष नियाज कापडी, इब्राहिम काझी, सचिव सईद उपाद्ये, सहसचिव शौकतअली खलफे, खजिनदार शिकूर गैबी यांच्यासह सर्व सदस्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी समर्थचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कसबा हायस्कूलच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात जिल्हा, विभाग व राज्यस्तरापर्यंत गाठलेली मजल सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

