(खेड)
तालुक्यातील कळंबणी बुद्रुक (जोशीवाडी) येथे एका १६ वर्षीय युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (२९ जून) रात्री घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जोशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अंकुश मनोहर जोशी (वय १६, रा. जोशीवाडी, कळंबणी बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी रात्री सुमारे ९.३० वाजता तो गावातील रेल्वेफाट्यानजीक गेला असता, समोरून येणाऱ्या रेल्वेखाली उडी घेतली. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, कोणतीही सुसाइड नोटही आढळून आलेली नाही. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. अंकुशच्या मृत्यूमुळे जोशी कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले असून, गावातही शोककळा पसरली आहे.

