( खेड )
तालुक्यातील तळे येथे विंचूदंशाने नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सोहम मंगेश शिर्के (वय १६, रा. कासारवाडी, तळे) या विद्यार्थ्याला ११ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास विंचूने दंश केला. नातेवाइकांनी त्याला तातडीने तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टर अनुपस्थित असल्याने केवळ प्राथमिक उपचार करून त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर होत असल्याने त्याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. सोहमने यावर्षी तळे हायस्कूलमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनुपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी दिली.
रुग्णवाहीकेत वेळेचा अपव्यय?
प्राथमिक चौकशीत घरच्यांनी रुग्णाला सुरुवातीस खेड येथील एका खासगी रुग्णालयात नेल्याचे, त्यानंतर पुन्हा कळंबणी व अखेर डेरवण येथे नेण्यात आल्याने उपचारात वेळ निघून गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ही वेळेत न मिळालेली वैद्यकीय मदत सोहमच्या मृत्यूस कारणीभूत ठरली, अशी भावना व्यक्त होत आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या सज्जतेच्या दाव्यांना तडे
प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या जातात. विंचू-सर्पदंशासारख्या घटनांसाठी लसीचा साठा आणि डॉक्टरांची उपस्थिती अत्यावश्यक मानली जाते. मात्र प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचे वास्तव समोर येत असल्याने, अशा सूचनांचे पालन किती प्रभावीपणे होते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस आणि आरोग्य विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.