( मुंबई )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण आता आधारकार्डद्वारे ई-केवायसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, चालू आर्थिक वर्षात १८ सप्टेंबरपासून पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व लाभार्थींचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक राहील. दिलेल्या कालावधीत प्रमाणीकरण न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पडताळणीत उघड झालेले गैरप्रकार
- माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे २६ लाख लाभार्थी पात्र नसल्याचे आढळले आहे.
- काही पुरुष, सरकारी कर्मचारी-अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांकडूनही या योजनेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले आहे.
- याच पार्श्वभूमीवर कागदपत्रांची सूक्ष्म छाननी सुरू असून, ई-केवायसी ही त्यातील महत्त्वाची प्रक्रिया ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून २ महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी करणे बंधनकारक राहील असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

