(मुंबई)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेवरून विरोधकांकडून टीका होत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. संघाच्या कार्यक्रमाला कोणी जाऊ नये किंवा सलमान खान यांनी जाऊ नये असे म्हणण्यात काही अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले. सलमान खान हा देशाचा नागरिक असून, सर्व नागरिकांना विविध संघटना आपल्या कार्यक्रमांना बोलावत असतात. त्यामुळे सलमानने कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणून त्याचा मोठा मुद्दा केला जाऊ नये, असे दानवे म्हणाले.
याचवेळी त्यांनी दुहेरी राजकीय निकषांवरही सवाल उपस्थित केला. संघाने एखाद्याला आमंत्रित केले तर त्याला राष्ट्रवाद म्हटले जाते, पण इतर पक्ष किंवा संघटनांनी एखाद्या समाजातील व्यक्तीला मंचावर बोलावले तर त्यावर टीका होते, असे ते म्हणाले. शिवसेनेने एखाद्या मुस्लिम व्यक्तीला व्यासपीठावर स्थान दिले तर लगेच धर्माचा मुद्दा उपस्थित केला जातो, मात्र संघाने तेच केले तर ते राष्ट्रवाद ठरते, ही विसंगती असल्याची टीकाही दानवे यांनी केली.
सलमान खान हा कलाकार असून तो अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहत असतो, असे सांगत दानवे यांनी परखड मत व्यक्त केले. कलाकार म्हणून सलमान खान पैशांसाठी कुठेही जाऊ शकतो, तसेच भाजपाला आपली प्रतिमा सुधारायची असेल तर अशा प्रसिद्ध कलाकारांचा वापर केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘संघ प्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज’ या विषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांची दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सलमान खान यांनी उपस्थिती लावल्याचे समोर आले आणि त्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला.
या प्रकरणावर ‘जमात-ए-इस्लामी हिंद’चे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आदिल मदनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खान यांना पैसे दिले असावेत, म्हणूनच ते संघाच्या कार्यक्रमात गेले असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. कलाकारांचे सहाय्यक उपस्थितीचा कालावधी आणि मानधन ठरवतात, त्यामुळे संघाकडून मानधन देण्यात आले असावे, असेही ते म्हणाले. यामागे भाजपाची देशातील प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न असू शकतो, असा आरोपही त्यांनी केला आहे. सलमान खान यांच्या उपस्थितीमुळे कलाकारांची राजकीय भूमिका, संघ आणि भाजपाची प्रतिमा तसेच राजकीय दुहेरी निकष या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

