( मुंबई )
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे बंधूंनी ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा जाहीर केला. या वचननाम्यात मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित असलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. पाळणाघरे, पाळीव प्राणी धोरण, पाणी व सांडपाणी व्यवस्था, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या विषयांवर ठोस आश्वासनं देण्यात आली असून हा वचननामा निवडणुकीत गेमचेंजर ठरेल का, यावर चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईकरांसाठी १ लाख परवडणारी घरे
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांना न देता त्या जमिनींवर मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलिस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासाठी मुंबई महापालिकेचं स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून पुढील पाच वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी घरे देण्यात येतील, असं वचननाम्यात नमूद करण्यात आलं आहे.
घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ‘स्वाभिमान निधी’
घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा ‘स्वाभिमान निधी’ देण्यात येणार आहे. तसेच कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांना आर्थिक सहाय्य आणि नवीन परवाने दिले जातील. समुदायांतर्गत परवाना हस्तांतरणाची सुविधाही यामध्ये समाविष्ट असेल.
कष्टकरी मुंबईकरांसाठी १० रुपयांत नाश्ता
कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणाऱ्या ‘मॉंसाहेब किचन्स’ सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासोबतच प्रमुख रस्त्यांवर दर दोन किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. या शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन पॅड व्हेंडिंग मशिन्स आणि लहान मुलांचे डायपर्स बदलण्याची सोय असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा हा वचननामा मुंबईकरांचा कौल कितपत बदलतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

