( पुणे )
होळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाचे आणि देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यंदाही द्राक्ष महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर ट्रस्टतर्फे गणरायाला तब्बल 2000 किलो द्राक्षांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. काळी, हिरवी आणि लाल टपोऱ्या द्राक्षांनी गाभारा व सभामंडप सजवण्यात आल्याने मंदिर परिसरात भक्तिमय आणि आकर्षक वातावरण निर्माण झाले होते.
या भव्य आरासीसाठी सह्याद्री फार्म्स या नाशिकस्थित कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दर्जेदार, रसायनमुक्त आणि निर्यातक्षम द्राक्षांचा वापर करण्यात आला. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच विघ्नहर्त्याचे आशीर्वाद मिळावेत, हंगाम सुरळीत पार पडावा आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या भावनेतून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून दगडूशेठ गणपतीत द्राक्ष हंगामात अशी आरास करण्याची परंपरा सुरू आहे. सध्या सह्याद्री फार्म्सशी सुमारे 22 हजार शेतकरी जोडले गेले असून, भारतातील प्रमुख द्राक्ष निर्यातदारांपैकी एक म्हणून कंपनीची ओळख आहे. नव्या पेटंटेड द्राक्ष वाणांच्या उत्पादनावरही कंपनी भर देत आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिक न राहता कृषी क्षेत्राला चालना देणारा ठरतो.
या द्राक्ष महोत्सवाचा सामाजिक पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे. गणरायाच्या आराशीनंतर ताजी द्राक्षे प्रसादरूपाने भाविकांना वाटली जाणार आहेत. याशिवाय परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि विविध सेवाभावी संस्थांना द्राक्षांचे वितरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे ससून General Hospital येथील रुग्णांनाही प्रसाद स्वरूपात द्राक्षे देण्यातआली.
मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्यदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. त्यामुळे हा महानैवेद्य श्रद्धा, आरोग्य आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम साधणारा ठरतो. होळीच्या सणानिमित्त साजरा झालेला हा द्राक्ष महोत्सव केवळ देखावा न राहता शेतकरी, भक्ती आणि समाज यांना जोडणारा उपक्रम म्हणून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

