मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक सुविधांशी जोडले गेलो आहोत. बहुतांश दैनंदिन कामे आता मोबाईलवरच पूर्ण केली जातात. या तांत्रिक सुविधांमुळे जिथे जीवन सोपे झाले आहे, तिथेच फसवणुकीच्या प्रकारांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp च्या माध्यमातून अनेक यूजर्सची फसवणूक केली जात आहे. अनेकदा आपल्याला अनोळखी नंबरवर WhatsApp कॉल येत असतात. काही वेळा आपण अशा कॉल्सकडे दुर्लक्ष करतो. मात्र, वारंवार असे कॉल आल्यावर अखेर रिसिव्ह करतो. पण अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल रिसिव्ह करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला एक न्यूड मुलगी असते. जोपर्यंत तुम्ही कॉल डिसकनेक्ट करण्याचा प्रयत्न करता, तोपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला असून, एका वयोवृद्ध व्यक्तीला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तब्बल १४ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील संदेशनगर गारखेडा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
एका न्यूज वाहिनीच्या वृत्तानुसार , फिर्यादी वृद्ध हे सेवानिवृत्त आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील हे वयोवृद्ध आंघोळ करत असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलताच समोर निर्वस्त्र अवस्थेतील तरुणी दिसली. या तरुणीने व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला आणि त्याचा गैरवापर करत वयोवृद्धास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “हा व्हिडिओ व्हायरल करीन” अशी धमकी देत, आरोपीने वेगवेगळ्या कारणांनी १४ लाखांहून अधिक रक्कम उकळली. एवढी रक्कम देऊनही ब्लॅकमेलिंग थांबले नाही. अखेर त्रस्त होऊन संबंधित वयोवृद्धाने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंद सिंग आणि दोन अज्ञात अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंधित वृद्धाकडून तब्बल १४ लाख ६६ हजार ७७३ रुपये उकळले आहेत. २३ मार्च ते २८ एप्रिल या काळात संदेशनगर, गारखेडा भागात हा प्रकार घडला. १४ लाखाहून अधिकची रक्कम देऊनही आरोपी आणखी जास्त पैसे मागत होते. अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून वृद्धाने पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
खबरदारी घ्या, पोलिसांचे आवाहन
- अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल उचलताना खबरदारी घ्या. अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल टाळणे चांगले. कॉल नाकारल्यानंतर, त्या नंबरला ब्लॉक करा जेणेकरून तुम्हाला पुन्हा कॉल येणार नाही.
- अशा प्रकारांमध्ये गुन्हेगार मानसिक आणि सामाजिक दबावाचा गैरफायदा घेतात. व्हिडिओ कॉलमध्ये काय बोलता किंवा काय करता याबद्दल सावध रहा. तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. किंवा व्हिडिओवर समोरच्या व्यक्तीने काही गैर करायला सांगितले तर भावनेच्या भरात जाऊन काही करू नका, आपला व्हिडिओ रेकोर्ड केला जात असतो.
- अशा प्रसंगी लगेच पोलिसांशी संपर्क साधा आणि आर्थिक व्यवहार टाळा.
सायबर एक्सपर्ट्सनुसार, याप्रकारच्या व्हिडिओ कॉल्स आणि ब्लॅकमेलिंग मागे संपूर्ण गँग असते. या लोकांचे कामच कॉल करून व्हिडिओ बनवणे व त्यानंतर ब्लॅकमेल करून पैसे लुटणे आहे. हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर तो समाजाला सावध करणारा इशारा आहे. डिजिटल युगात आपण जिथे फायदे घेत आहोत, तिथे धोकेही ओळखून काळजी घेणे आवश्यक आहे. ब्लॅकमेलिंगसाठी येणाऱ्या कॉलकडे दुर्लक्ष करून त्वरित सायबर पोलिसांना याची माहिती द्या.