(भोपाळ)
ट्रम्प प्रशासनाने दिलेली एपस्टिन फाइल्स उघड करण्याची धमकी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत सुरू असलेल्या खटल्याच्या दबावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका व्यापार करार केला, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेस पक्षाकडून आयोजित किसान महाचौपालला (शेतकरी महाचावडी) ते संबोधित करत होते. त्यांनी पंतप्रधानांना हिंमत असेल तर अमेरिकेसोबतचा व्यापार करार रद्द करण्याचे आव्हान दिले.
नरेंद्र मोदींनी तडजोड केली आहे. ट्रम्प प्रशासनाने त्यांना अडकवले आहे. मोदींनी दबावाखाली अमेरिकेसोबत व्यापार करार केला आहे. मात्र हा व्यापार करार नसून शेतकऱ्यांवरील आघात आहे, असे राहुल म्हणाले. भारत-अमेरिका व्यापार करार चार महिन्यांपासून रखडला होता. परंतु असे काय झाले की, पंतप्रधानांनी अचानक त्यावर सहमती दर्शवली, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आणि नंतर स्वतःच त्याचे उत्तर दिले. मोदींनी हा करार करण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अमेरिकेत पडलेल्या लाखो एपस्टिन फाइल्स. या फाइल्समध्ये ई-मेल, संदेश आणि व्हिडिओ आहेत. अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या ‘एपस्टिन फाइल्स’ मध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींना धमकावण्यासाठी त्यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे. अमेरिकेने धमकी दिली आहे की, जर मोदींनी आमचे ऐकले नाही तर फायलींमधील पुरावे उघड होतील, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
अमेरिकेत अदानींविरुद्ध सुरू असलेला फौजदारी खटला हे पंतप्रधान मोदी यांनी व्यापार करारावर सहमती दर्शविण्याचे दुसरे कारण आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या खटल्याचे लक्ष्य अदानी नव्हे तर नरेंद्र मोदी आहेत, असे राहुल म्हणाले. मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाशी सल्लामसलत न करता अमेरिकेसोबतचा करार मंजूर केल्याचा दावा राहुल यांनी केला. तसेच मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हा करार रद्द करावा, असे आव्हानही राहुल यांनी दिले.
नरवणेंच्या आत्मचरित्रावरून घणाघात
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलण्यापासून रोखल्याचा मुद्दाही गांधींनी उपस्थित केला. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला लोकसभेत बोलू दिले गेले नाही. माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्रातील उल्लेखावर मला बोलायचे होते. नरवणे यांच्या आत्मचरित्रानुसार चिनी रणगाडे भारतीय सीमेजवळ येत असताना त्यांनी प्रत्युत्तरासाठी आदेश देण्याकरिता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांन फोन केला. परंतु त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्या दिवशी मोदींनी लष्कराला एकटे सोडले. चीनला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली होती तेव्हा मोदी गायब झाले होते, असा घणाघात राहुल यांनी केला.

