(कोल्हापूर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात “मुलींच्या जन्माचे स्वागत” हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते सीपीआर शासकीय रुग्णालयात सोन्याची अंगठी वितरण सोहळा पार पडला.
हा उपक्रम १६ सप्टेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते १७ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत गोरगरीब कुटुंबांमध्ये जन्मलेल्या मुलींना उद्देशून राबविण्यात आला. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात जन्मलेल्या एकूण ४२ मुलींना सोन्याची अंगठी देण्यात आली. त्यापैकी सीपीआर रुग्णालयात जन्मलेल्या ८ मुलींना आणि जिल्ह्यातील विविध ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये जन्मलेल्या ३४ मुलींना हा लाभ मिळाला. यामध्ये जुळ्या मुलींचाही समावेश होता.
या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, “समाजात मुलींच्या जन्माबाबत अजूनही नकारात्मक विचार आहेत. तो दृष्टिकोन बदलून मुलींच्या जन्माचे स्वागत सकारात्मकतेने व्हावे यासाठी हा उपक्रम राबवला. प्रधानमंत्री मोदी महिलांसाठी लखपती दीदी, ड्रोन दीदी, लाडकी बहीण यांसारख्या अनेक योजना राबवत आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापुरात हा विशेष प्रयोग करण्यात आला. मुलीचा जन्म हा एक आशीर्वाद आणि वरदान आहे असा संदेश देण्याचा यामागील उद्देश आहे.”
या प्रसंगी महाडिक यांनी असेही जाहीर केले की, येत्या वर्षी ज्या कुटुंबांमध्ये मुलींचा जन्म होईल त्यांना दोन चंदनाचे रोप भेट दिले जाईल. या रोपांना कायदेशीर प्रमाणपत्रे दिली जातील आणि जेव्हा ती वाढतील तेव्हा अंदाजे ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, जे मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी वापरले जाईल असे देखील ते यावेळी म्हणाले.

