(नाशिक)
भारतीय जनता पक्षाने यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर नाशिकमध्ये त्याचे स्पष्ट पडसाद उमटले आहेत. या निर्णयामुळे नाशिकच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 7 मधून अजिंक्य फरांदे यांनी सकाळी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजपच्या नव्या निर्णयाचा सन्मान राखत त्यांनी काही तासांतच उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.
“भाजपमध्ये राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग व्यक्ती ही भूमिका आहे. पक्षाचा आदेश श्रेष्ठ मानून मी नम्रपणे हा निर्णय स्वीकारत आहे,” असं अजिंक्य फरांदे यांनी स्पष्ट केलं. फरांदे कुटुंब गेली चार दशके भाजपच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असून, पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून मिळालेला विश्वास हीच आपली खरी राजकीय संपत्ती असल्याचं सांगत, निवडणूक न लढवता देखील नागरिकांच्या समस्या आणि विकासकामांसाठी सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
याच निर्णयाचा परिणाम नाशिकच्या भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या कुटुंबावरही झाला आहे. आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे बेंडाळे या प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक उमेदवार होत्या. मात्र भाजपच्या धोरणात्मक निर्णयानंतर त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

