(रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा महाविद्यालयाजवळील उताराने पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा रचला. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जयगडहून पालीच्या दिशेने जाणाऱ्या (क्रमांक KA 29 C 1843) ट्रकचे नियंत्रण सुटले आणि त्याने अक्षरशः कहर माजवला. तब्बल आठ वाहनांना ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये चार चारचाकी, तीन दुचाकी व एका रिक्षाला ट्रकने ठोकरले. या भीषण अपघातात झरेवाडीतील शिवम वीरेंद्र गोताड (१९) याचा जागीच मृत्यू झाला. काहीजण किरकोळ जखमी झाले असून एक-दोन वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे.
हातखंबा महाविद्यालयाचा हा उतार नागरिकांसाठी कायमचा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे पुलाचे काम रखडले आहे.तर दुसऱ्या बाजूला तात्पुरता धोकादायक चढणीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. परिणामी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेली बारीक खडी, घसरडा उतार आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बीट अंमलदार भिसे यांच्यासह पोलिस व स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात हलवले. नंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव व उपविभागीय अधिकारी माईणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्यानंतर वाहतूक एकेरी मार्गाने सुरू करण्यात आली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र पालकमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांचे म्हणणे समजून घेतले. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. ठेकेदाराच्या बेपर्वाईला जबाबदार धरून कडक कारवाई करावी, तसेच ओव्हरलोड व वेगवान ट्रकांवर तातडीने अंकुश आणावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नाहक गेलेला जीव, जबाबदार कोण?
या जीवघेण्या उतारावरील बुधवारी घडलेल्या अपघातात १९ वर्षीय शिवम गोताड या तरुणाचा नाहक बळी गेला. त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण, हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारत आहे. ट्रकचालकाची चूक, ठेकेदाराची निकृष्ट कामगिरी की प्रशासनाचे ढिसाळ नियोजन शेवटी किंमत मात्र एका निरपराध जीवाने चुकवली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे उघड उघड दुर्लक्ष हेच या दुर्घटनेचे मूळ आहे. वारंवार अपघात घडूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. बैठका होतात, आदेश निघतात; पण प्रत्यक्षात रस्त्यावर काहीच बदल होत नाही. उलट निकृष्ट दर्जाचे काम करून काही दिवसांतच पॅच उखडतात, खडी पसरते आणि नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ केला जातो हेच चित्र दिसून येते.
(बातमी अपडेट होत राहील.)

