(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एक ऐतिहासिक टप्पा पार करत ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय नोंदवला असून बँकेला ९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. या यशस्वी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर बँकेने यावर्षीही सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला आहे, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सर्वसाधारण सभेत केली.
शहरातील जयेश मंगल पार्क येथे आयोजित सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. डॉ. चोरगे म्हणाले की, बँकेशी संलग्न पतसंस्थांना पतपुरवठ्यावरील व्याजदरात अर्था टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यामुळे पतसंस्थांचा कर्जपुरवठा आणि वसुली दोन्ही वाढतील. जिल्ह्यात बँकेच्या एकूण ७४ शाखा असून, त्यापैकी २५ शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत आहेत. उर्वरित शाखाही स्वमालकीत आणण्याचे धोरण राबवले जात आहे.
कोरोना काळात मृत झालेल्या सभासदांचे कर्ज माफ करून बँकेने सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले आहे. बँकेने आतापर्यंत १०० संगणक शाळांना संगणक भेट दिले असून, अनाथ आश्रम, दिव्यांग वसतीगृहे, साहित्य संमेलन, शेतकरी कार्यशाळा अशा उपक्रमांसाठी सुमारे ५५.८५ लाख रुपयांची मदत केली आहे. निसर्ग चक्रिवादळ आणि महापुरात नुकसान झालेल्या शेतकरी, लघुउद्योजक व संस्थांना ५ टक्के व्याजदराने २५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. ग्राहकांसाठी ३ मोबाईल एटीएम व्हॅन कार्यरत असून, त्या नऊ तालुक्यांत सेवा देत आहेत. याशिवाय डिजिटल बँकिंग, आर्थिक साक्षरता केंद्रे आणि पतसंस्थांना दरमहा आर्थिक मदत अशा योजनाही बँकेतर्फे राबविल्या जात आहेत.
शेती सहकारी संस्थांना भक्कम आधार
जिल्ह्यातील प्राथमिक शेती सहकारी संस्थांना ५ लाख रुपये मर्यादेपर्यंत कार्यालयीन इमारतीच्या बांधकामासाठी मदत देण्यात येत आहे. संस्थांच्या ठेवी, कर्जवाटप आणि वसुली कार्यक्षम करण्यासाठी निश्चित निकषांवर आधारित आर्थिक सहाय्यही पुरवले जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण येत्या महिन्यात सेवानिवृत्त होत असून, त्यांना डॉ. चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, उपनिबंधक सोपान शिंदे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.

