(रत्नागिरी)
शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसर रविवारी सायंकाळी मृत्यूच्या थराराने हादरला. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास स्पीड ब्रेकरजवळ भरधाव होंडा सिटी वाहनाने दिलेल्या धडकेत सदर महिला रस्त्यावर कोसळली. क्षणातच हे चार चाकी वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने चालकाने पलायन केले, यामुळे घटनास्थळी संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या दुर्घटनेत सौ. सुनीता राजेश साळवी (वय ७०, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांचा जागीच गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेनंतर महिला रस्त्यावर फेकली गेली आणि वाहन थांबण्याआधीच त्यांच्या अंगावरून गेल्याने अपघात अधिक भयावह ठरला. या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने जखमी महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात राजीवडा येथील युवकांविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. सुनीता साळवी या रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध ‘सहेली ब्युटी पार्लर’च्या संचालिका होत्या. गेली ३० वर्षे त्या रत्नागिरीत ब्युटी पार्लर व्यवसाय करत होत्या. शहरातील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. रत्नागिरी शहरात त्यांचे दोन पार्लर असल्याची माहिती आहे.
या घटनेची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना दिले आहेत. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, शहरातील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ठोकर लागून रस्त्यावर पडलेल्या एका महिलेच्या अंगावरून गाडी नेण्याइतका निर्दयी प्रकार कसा घडू शकतो, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
सौ. सुनीता साळवी यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने रत्नागिरी शहरातील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

