(जाकादेवी / संतोष पवार)
दापोली तालुक्यातील स्नेहदीप संचलित इंदिराबाई वामन बडे कर्ण बधिर विद्यालय आणि पुणे येथील स्काय रोबोटिक्स यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने आधुनिक काळात अद्ययावत अशी ई. आय. टिंकर लॅब ( प्रयोगशाळा) उपलब्ध करून दिली.या प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते फीत सोडून करण्यात आले. ही प्रयोगशाळा उभारण्यात पुणे येथील स्काय रोबोटिक्स संस्थेचे डायरेक्टर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभिजीत सहस्त्रबुद्धे, संस्थेचे डायरेक्टर कृष्णमूर्ती सर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. प्रयोगशाळा उभारण्यात थोर देणगीदार व दानशूर व्यक्तिमत्त्व डॉ.मुग्धा बडे राऊत, आणि मोहन राऊत यांचे मोठे आर्थिक योगदान मिळाले.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कर्णबधीर मुलांच्या कौशल्याचा विकास होण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात दिव्यांग विद्यार्थी स्वावलंबनाच्या दृष्टीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, विविध क्षेत्रात रोजगार व नोकरीच्या संधी मिळाव्यात, यासाठी राज्यातील नव्हे, तर भारतातील पहिली ( EI TINKAR LAB )ई आय प्रयोगशाळा उभी करण्यात आली आहे. देशातील पहिल्या प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते अतिशय उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर, शिक्षण प्रेमी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
यामध्ये स्नेहदीप संचलित इंदिराबाई वामन बडे कर्ण बधीर संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्मिता सुर्वे, संस्थेचे खजिनदार समीर गांधी, सेक्रेटरी विजयसिंह पवार, राहूल मराठे, विद्यालयाचे अध्यक्ष दिपक हर्डीकर,विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर जालगांवकर, डॉ. मुग्धा बडे राऊत, डॉ. राऊत , केंद्रप्रमुख सुनिल कारखेले, सौ. शुभांगी गांधी, सौ. कोपरकर, श्रीम.धर्माधिकारी, सौ. अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली गरज ओळखून या शाळेला ई आय टिंकर लॅब उभी करण्यात पुणे येथील स्काय रोबोटिक्स संस्थेचे सेवाभावी डायरेक्टर माझे मित्र अभिजीत सहस्रबुद्धे, अभ्यासू अध्यापक कृष्णमूर्ती सर यांनी कष्ट घेतले. आज समाजात संवेदनशीलतेचा तुटवडा पडत आहे. असे असताना खरोखरच या दिव्यांग असलेल्या मुलांची संवेदनशीलता ध्यानात घेऊन, येथील स्नेहदीप संचलित शिक्षण संस्थेची गरज लक्षात घेऊन स्नेह दीप दापोली संचलित इंदिराबाई वामन बडे मूकबधीर विद्यालय व पुणे स्काय रोबोटिक्स या संस्थेने जिद्दीने पुढाकार घेऊन अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करून देऊन एक मोठा आदर्श घालून दिला आहे. समाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक झाला पाहिजे, या प्रयोगशाळेचा वापर कर्णबधीर विद्यार्थ्यांना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या विद्यालयात सुमारे ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आईच्या मायेने शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांची काळजी घेत शिक्षण देत असल्याने या विद्यालयाचा प्रगतीचा आलेख उंचावत आहे. १९८५ पासून शिक्षण संस्थेने हे विद्यालय सुरू केले असून या विद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्यात्मक कृतीवर अधिक भर दिला जातो.या प्रयोगशाळेचा लाभ दापोली तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शिक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी प्रमुख मार्गदर्शक व ई आय टिंकर लॅबचे उद्घाटक डॉ.विनय सहस्रबुद्धे यांनी आवाहन केले. दुपार सत्रात कर्णबधीर विद्यालयातर्फे विविध कलागुणांचा अविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सदरचा कार्यक्रम इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्मिता सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मिळवून देलेल्या अमूल्य देणगीचे आम्ही नक्कीच सोने करू, असा आशावाद व्यक्त करत या कामी दिलेल्या सर्व देणगीदारांचे, कष्ट घेतलेल्या सर्व व्यक्तींना संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्मिता सुर्वे यांनी अध्यक्षीय भाषणातून मनस्वी धन्यवाद दिले. ई आय टिंकर लॅब उपलब्ध झाल्याने विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, देणगीदार तसेच शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.