(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणातील गणेशोत्सव म्हटले की रात्रभर चालणाऱ्या आरत्या, भजने, महिलांच्या फुगड्या, ओव्या आणि गावगावांत रंगणारे पारंपरिक खेळ… हीच खरी ओळख. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात या परंपरांना धक्का बसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. डिजिटल युगातील सोशल मीडियावरील ‘व्हायरल ट्रेंड’ने पारंपरिक कार्यक्रमांच्या जागी घर करून तरुणाईला अक्षरशः भुरळ घातली आहे.
गणपतीसमोर भक्तीगीतांवर टाळ्या वाजवण्याऐवजी किंवा फुगड्यांमध्ये महिलांनी रंगण्याऐवजी अनेक तरुण-तरुणी डीजेच्या तालावर थिरकत रील्स तयार करताना दिसले. एका लोकप्रिय व्हायरल गाण्यावर रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू होताच गावागावांत तोच माहोल दिसून आला. पारंपरिक कोकणी संस्कृतीच्या जागी आधुनिक डिजिटल मनोरंजन हळूहळू पाय रोवत असल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
पूर्वी गणेशोत्सव हा एकात्मतेचा, आपुलकीचा आणि सामूहिक सहभागाचा उत्सव मानला जायचा. रात्रीभर चालणाऱ्या फुगड्या, ओव्या, खेळ यामुळे गावात एक वेगळेच चैतन्य निर्माण व्हायचे. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रमांचा आनंद घेतल्याने आपसातील नातेसंबंध अधिक घट्ट होत असत. परंतु आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे की एकत्र बसून गप्पा मारण्याऐवजी सर्वजण आपापल्या स्क्रीनमध्ये गुंतलेले दिसतात.
संस्कृती टिकवायची तरुणाईपुढील आव्हान
गणेशोत्सवात आधुनिकतेसोबत पारंपरिकतेचेही संगोपन झाले पाहिजे, अन्यथा कोकणाचे वेगळेपणच हरवेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. डिजिटल युगातील या नव्या पिढीसमोर कोकणातील संस्कृती जपण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

