(दापोली)
दापोली पंचायत समितीच्या आवारातील शौचालयांची बिकट अवस्था सध्या नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध शासकीय कामानिमित्त येथे येणाऱ्या नागरिकांना, विशेषत: महिलांना, मूलभूत सोयींच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
समितीच्या आवारात उभारलेली शौचालये अत्यंत घाणेरडी अवस्थेत असून, पाणीपुरवठ्याची कुठलीही सोय नाही. नळ बसवलेले असले तरी त्यांतून पाणीच येत नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. परिणामी, आरोग्य विभागाशी निगडीत कार्यालयातूनच अस्वच्छतेचा संदेश जात असल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. फक्त शोभीकरणापुरते नळ बसवले; मात्र प्रत्यक्षात पाणीपुरवठाच नाही. या परिस्थितीत महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून शौचालयांची नियमित स्वच्छता, पाणीपुरवठ्याची व्यवस्था आणि देखभाल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक व महिला वर्गाकडून करण्यात येत आहे.

