(लांजा /रत्नागिरी)
अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने गंभीररीत्या भाजलेल्या गवाणे-रेवाळेवाडी येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रभाकर शंकर रेवाळे (वय ५८, रा. गवाणे रेवाळेवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०७ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर रेवाळे हे जन्मापासून दोन्ही पायांनी दिव्यांग होते. शारीरिक व्यंगामुळे मागील काही महिन्यांपासून ते मानसिक तणावात असल्याचे त्यांच्या भावाने दिलेल्या माहितीत नमूद आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील रॉकेलचा डबा घेऊन अंगणात येत अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात येताच शेजारी आणि ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर प्रकृती गंभीर असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
याबाबत मृताचे भाऊ अनंत सखाराम रेवाळे यांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. संबंधित कागदपत्रे लांजा पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर आकस्मिक मृत्यू क्रमांक ५८/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.


