(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड–हातखंबा हा रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत असून, गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव बळी जात असल्याचा गंभीर आरोप जयगड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर (अध्यक्ष, खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था) यांनी केला आहे.
सन 2005 पासून या मार्गावरून जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्यातील मालवाहतूक सुरू झाली. सुरुवातीला प्रमाण कमी असल्याने अडचणी जाणवल्या नाहीत; मात्र मागील दशकभरात वाहतुकीचे प्रचंड ओझे वाढले, पण रस्त्याची स्थिती मात्र जसजशीच्या तशीच आहे. ओव्हरलोड ट्रक, खड्डेमय रस्ते आणि चालकांचा बेफाम वेग यामुळे महिन्याला किमान एक निष्पाप नागरिकाचा बळी जातो, अशी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गत आठवड्यात हातखंबा येथे झालेल्या भीषण अपघातात केवळ 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शाळा–महाविद्यालयांच्या परिसरातून जाणारा हा मार्ग पालकांसाठीही धास्तावणारा ठरत आहे. वारंवार बंद पडणाऱ्या मालवाहतूक वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गावणकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या कार्यालयात नायब तहसीलदार सौ. श्रुती सावंत यांना निवेदन सादर केले.
पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना न केल्यास जनतेच्या रोषाचा उद्रेक होणार आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. तोपर्यंत या मार्गावर कोणतीही मालवाहतूक होऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा या निवेदनातून देण्यात आला.
दिवसाढवळ्या रस्त्यावर कीड्या–मुंग्यांसारखे चिरडून मरावे लागणे हा नागरिकांचा भाग्यलेख नाही. सर्वसामान्यांच्या जगण्याचा मूलभूत हक्क वाचवण्यासाठीच मोठा लढा उभारला जाईल, अशी भूमिका सामाजिक संस्थेने घेतली आहे.

