(रत्नागिरी / वैभव पवार)
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राच्या लावणी नृत्यकला पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावची कन्या रसिका राकेश पवार हिला मिळाला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे मालगुंडसह संपूर्ण कोकणासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मूळची मालगुंड येथील आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेली २५ वर्षीय रसिका ही नृत्य आणि अभिनय क्षेत्रातील बहुआयामी कलाकार आहे. लावणी हा तिचा विशेष आवडीचा नृत्यप्रकार असून, तिने कथ्थकचे चौथ्या वर्षापर्यंतचे शास्त्रीय प्रशिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय वांद्रे येथील थ्री स्टार अकादमीतून लोकनृत्य आणि पाश्चात्त्य नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. शास्त्रीय, वेस्टर्न, समकालीन, टॉलीवूड, बॉलिवूड, वॅकिंग, हिप हॉप आणि झुंबा अशा विविध नृत्यशैलींवरही तिचे प्रभुत्व आहे.
नृत्य क्षेत्रातील तिची कामगिरी अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उठून दिसली आहे. सिडनहॅम महाविद्यालयाची एकल स्पर्धा, संस्कृती कला दर्पण आंतरशालेय स्पर्धा सलग तीन वर्षे, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा तसेच महाराष्ट्र उत्सव लोकनृत्य समूह स्पर्धेत तिने सहभाग नोंदवत प्रथम पारितोषिके पटकावली आहेत. आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने विविध मंचांवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
केवळ नृत्य सादरीकरणापुरते मर्यादित न राहता रसिकाने नृत्यप्रशिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. जेडीआय डान्स क्लासेस, ३डी क्रू, ऑल राऊंडर अकादमी, सीवूड्स येथील एनएमएमसी सीबीएसई स्कूल येथे तसेच स्वतंत्र नृत्य व झुंबा प्रशिक्षक म्हणून तिने गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
नृत्याप्रमाणेच अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवासही उल्लेखनीय आहे. डॉक्टर विजया मेहता, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि स्मिता तळवळकर यांच्या अस्मिता चित्र अकादमीतून तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. छोट्या पडद्यावर झी मराठीवरील ‘अस्मिता’ आणि स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘लक्ष्य’ या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जांभूळ’ या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावरही अभिनयाची छाप पाडली.
रंगभूमीवर बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धांमधून तिने आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. ‘बंध नात्याचे’ या बालनाट्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला. ‘जेवणावळ’ या एकांकिकेसाठी पद्यश्री डी. वाय. पाटील महाकरंडकात तिने तृतीय क्रमांक पटकावला. ‘अस्तित्व – एक संघर्ष’ आणि ‘पोरींचा बाप डोक्याला ताप’ या नाटकांमधील तिच्या अभिनयाचेही विशेष कौतुक झाले. याशिवाय जे. ए. म्हात्रे चारिटेबल ट्रस्ट, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे, अटल करंडक आणि आम्ही वसईकर अशा नामांकित स्पर्धांमध्येही तिने अभिनयाची पारितोषिके मिळवली आहेत.
सध्या रसिका ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित ‘घासीराम कोतवाल’ या हिंदी नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
नृत्य, अभिनय आणि प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या रसिका पवारवर राष्ट्रीय एकता दिनाच्या प्रतिष्ठित मंचावर महाराष्ट्राच्या लावणी पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तिच्या या सन्मानासह यशस्वी वाटचालीबद्दल मालगुंडसह संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


