(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणरायाच्या मुख्य मंदिरात आज (रविवार, दि. २४ ऑगस्ट) रोजी भाद्रपदी गणेशोत्सवाचा शुभारंभ महापूजेद्वारे झाला. संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने पंच निलेश श्रीकृष्ण कोल्हटकर यांनी सपत्नीक ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात व जयघोषात श्रींची महापूजा केली.
या वेळी मंदिराचे मुख्य पुजारी प्रभाकर मोरेश्वर घनवटकर, अमित प्रभाकर घनवटकर, निलेश अशोक घनवटकर, अन्य ब्रह्मवृंद तसेच संस्थानचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर, पंच विनायक राऊत व विद्याधर (उर्फ उदय) शेंडे उपस्थित होते.
प्रति वर्षीप्रमाणे यंदाही संस्थानच्या वतीने २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणपतीपुळे गावात शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ‘एक गाव एक गणपती’ ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा या उत्सवात विशेषत्वाने जपली जाते.
गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन श्रद्धा आणि भक्तिभावाने या उत्सवात सहभागी होतात. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी ग्रामस्थांना थेट मंदिरातील गाभाऱ्यात श्रींच्या स्पर्शदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येते.
एकूणच, गणपतीपुळे येथील भाद्रपदी गणेशोत्सव हा स्थानिकांसाठी एकात्मतेचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा सोहळा ठरत आहे. भाद्रपदी गणेशोत्सवात स्थानिक ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने सहभागी होऊन या उत्सवाचा आनंद लुटतात.

