(रत्नागिरी)
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील सोनुर्ली गावातील कऱ्हाडीचे डोंगर येथे रस्ताही नसलेल्या घनदाट जंगलात झाडाला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या परदेशी महिलेला रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूग्णालयातून उपचारानंतर सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्या मायदेशी जाण्यासाठी पाठविण्यात आले आहे. आज (३ ऑक्टोबर) सकाळी ती महिला दोन महिला पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबई येथे जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर रवाना झाली. तिथून ती मुंबई विमानतळावरून पुढील सोपस्कार पार पाडून आपल्या मायदेशी परतणार आहे.
ही परदेशी महिला २७ जुलै २०२४ रोजी सावंतवाडीतील जंगलात सापडली होती. सुरुवातीला तिने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सावंतवाडी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून या महिलेच्या पतीचा शोध घेतला; मात्र नंतर ती मनोरुग्ण असून तिच्या पासपोर्टची मुदत संपल्याने अमेरिकेत जाण्यासाठी अडचणी येत असल्याने नैराश्येतून हे कृत्य स्वतः केल्याची माहिती तिने जबाबात दिली आहे. सिंधुदुर्गातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. अन्न पाण्याविना तिची दयनीय अवस्था झाली होती. यानंतर जिल्हासह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. तसेच याची अमेरिक दुतावासानेही दखल घेतली होती.
त्यानंतर तिला पुढील मानसिक उपचारासाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ तिच्यावर मनोरुग्णालयात उपचार सुरू होते. काल (२ ऑक्टोबर) तिला प्रादेशिक मनोरुग्णालयातून उपचार पूर्ण झाल्यामुळे सोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी ही महिला रत्नागिरी रेल्वे स्थानकातून मुंबई येथे जाण्यासाठी रवाना झाली. तिच्यासोबत दोन महिला पोलिसांचा बंदोबस्त होता लवकरच ती आपल्या मायदेशी परतेल.