(रत्नागिरी /प्रतिनिधी)
अंधाऱ्या रात्री एका अपघाताचा कॉल येतो… दुसऱ्याच्या मदतीसाठी खाकी वर्दीतील दोन देवदूत तातडीने घराबाहेर पडतात… पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मदतीसाठी निघालेल्या याच पोलीस अंमलदारांच्या गाडीला मागून येणाऱ्या एका भरधाव काळाने (ट्रेलरने) अशी भीषण धडक दिली की, क्षणात होत्याचे नव्हते झाले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनारी पुलाच्या तीव्र वळणावर शनिवारी रात्री ११:२० वाजण्याच्या सुमारास हा मन सुन्न करणारा थरार घडला.

या दुर्दैवी अपघातात कर्तव्यावर असलेले महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथील ASI संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) यांचा अत्यंत करुण अंत झाला. तर ट्रेलर चालकही (नाव अद्याप अस्पष्ट) केबिनखाली चिरडून मरण पावला. अपघाताची भीषणता इतकी प्रचंड होती की, धडकेनंतर सरकारी बोलेरो जीप आणि तो २२ टायरी महाकाय ट्रेलर, दोन्ही तब्बल ८० ते १०० फूट खोल दरीत कोसळले. शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्यातून एक निरोप आला की, ‘अंजनारी घाटाखालील नदीपात्रात एक वाहन कोसळले आहे!’ हा निरोप मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे ASI संतोष गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल अशोक शिंगाडे (बकल नं. ९४२) यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली सरकारी बोलेरो जीप (क्रमांक MH 08 BE 3561) काढली आणि ते घटनास्थळाकडे झेपावले. परंतु, अंजनारी पुलाच्या अवघ्या १०० मीटर अलीकडे, एका वळणाच्या तीव्र उतारावर मागून लोखंडी सळ्यांनी भरलेला एक २२ टायरी अवाढव्य ट्रेलर (क्रमांक RJ 09 GE 2397) अतिवेगात आला. रस्त्याच्या धोकादायक परिस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करत ट्रेलर चालकाने बेदरकारपणे पोलिसांच्या बोलेरो जीपला पाठीमागून जोरदार धडक दिली. ती धडक इतकी भयानक होती की, पोलिसांची बोलेरो गाडी थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या ८० ते १०० फूट खोल दरीत कोसळली. त्या पाठोपाठ तो ट्रेलरही रस्त्यावरून खाली घसरत जाऊन सुमारे १५-२० मीटर अंतरावर दरीत उलटा झाला.

अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागाचे DYSP कदम, पोलीस निरीक्षक दिपाली जाधव, API सत्यराज घुले, PSI बळवंत पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या मिट्ट अंधारात दरीत उतरून बचावकार्य सुरू करण्यात आले. दोन्ही पोलीस अंमलदारांना रक्ताच्या थारोळ्यात बाहेर काढून आधी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारापूर्वीच ASI संतोष गायकवाड यांची प्राणज्योत मालवली होती. दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी कर्तव्याची हाक ऐकून धावणाऱ्या एका कर्तव्यदक्ष खाकी वर्दीतील योद्ध्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण रत्नागिरी पोलीस दलावर आणि हातखंबा परिसरात शोककळा पसरली आहे. कर्तव्याची वेदीवर प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर पोलिसाला संपूर्ण महाराष्ट्रातून अश्रूधारेने श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
ट्रेलर चालकाचा केबिनखाली दबून अंत
या अपघातात जीपमधील दुसरे पोलीस अंमलदार PC अनिल शिंगाडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरीत प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील तातडीच्या उपचारासाठी त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार त्यांना आयसीयू (ICU) ॲम्ब्युलन्सद्वारे सांगली येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दुसरीकडे, धडक देणाऱ्या ट्रेलरचा चालक स्वतःच्याच वाहनाच्या केबिनखाली पूर्णपणे चिरडला गेला. केबिनमध्ये अडकल्यामुळे गुदमरून आणि गंभीर दुखापतींमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या साहाय्याने महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
क्रेनच्या साहाय्याने काढावा लागला ढिगारा
दुसऱ्या एका अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी निघालेल्या महामार्ग पोलिसांच्या बोलेरो गाडीला (MH 08 BE 3561) मागून येणाऱ्या २२ टायरी लोखंडी सळ्यांनी भरलेल्या अवजड ट्रेलरने (RJ 09 GE 2397) प्रचंड वेगात उडवले. क्षणात पोलिसांची गाडी हवेत भिरकावल्यासारखी थेट दरीत जाऊन कोसळली. धडकेमुळे गाडीचा मागचा आणि पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, छप्पर आणि दरवाजे चेंदामेंदा झाले आहेत. गाडीच्या इंजिनपासून ते सीटपर्यंत सगळा भाग एकमेकांत रुतला होता. याच चक्काचूर झालेल्या गाडीत एएसआय संतोष गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे अडकले होते. रात्रीच्या अंधारात स्थानिक ग्रामस्थ आणि लांजा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गाडीचे पत्रे कापून दोन्ही पोलिसांना बाहेर काढले. दुर्दैवाने, या भीषण अपघातात ASI गायकवाड यांचा मृत्यू झाला असून, पोलीस जीपचे झालेले नुकसान पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येत होता.
बचावकार्यासाठी पोलीस दलाचे अधिकारी आणि अंमलदार मध्यरात्री एकवटले
अपघाताची बातमी मिळताच लांजा उपविभागाचे DYSP सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बगळे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ८० ते १०० फूट खोल काळोख्या दरीत उतरणे अत्यंत आव्हानात्मक असतानाही, आपल्या खाकी वर्दीतील सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी या पथकाने जीवाची बाजी लावली. या मदतकार्यात आणि पंचनामा प्रक्रियेत महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे ASI भुजबळराव, राणे, नाईकवाडे, बाजागे, मारळकर आणि विलास जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मध्यरात्रीच्या भीषण अंधारात, दरीतील खडतर वाटांवरून चक्काचूर झालेल्या बोलेरो जीपमधून जखमींना बाहेर काढण्यासाठी या सर्वच पोलीस अंमलदारांनी शर्थीचे प्रयत्न केले. आपल्या सहकाऱ्याला गमावल्याचे तीव्र दुःख उराशी बाळगून, कर्तव्यभावनेने हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी पहाटेपर्यंत घटनास्थळी आणि रुग्णालयात तळ ठोकून होते.


