(खेड)
तालुक्यातील मिर्ले (ता. खेड) येथे वाळू तस्करीच्या कामावर न गेल्याचा राग धरून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडी सळईने झालेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, चौघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीर रवींद्र निकम (वय २६, रा. लक्ष्मीनगर, खोपी, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव असून, तो मंडप डेकोरेशनचे काम करतो. मे महिन्यात संशयित केतन प्रमोद साळवी याने त्याला रात्री अवैध वाळू उपसा करण्यासाठी मजुरीवर बोलावले होते. मात्र, अमीर याने ‘मी रात्री अशा कामावर येणार नाही,’ असा नकार दिल्याने त्याच्या मनात चीड निर्माण झाली.
११ सप्टेंबर रोजी रात्री अमीर आपल्या सहकाऱ्यांसह मंडपाचे काम उरकून परतत असताना मिर्ले-बौद्धवाडी येथे संशयित प्रणीत प्रमोद साळवी, केतन प्रमोद साळवी, नंदेश साळवी व नरेश साळवी यांनी त्याला अडवले. यावेळी जातिवाचक शिवीगाळ करीत ‘तुला घरात घुसून मारू,’ अशी धमकी देत लोखंडी सळईने अमीरवर हल्ला चढवला. या मारहाणीत अमीरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, अन्य साथीदारांनीही त्याला बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी अवस्थेत अमीर याला सहकाऱ्यांनी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), १२६(२), ३५१(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

