(खेड)
तालुक्यातील घाणेखूंट गवळवाडी येथे एका पडीक घरात सुमारे दोन ते तीन दिवसांपासून मृतावस्थेत असलेला इसम आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून त्यावर जंतुसुद्धा पडलेले असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले.
मृत व्यक्तीची ओळख इब्राहीन उस्मान शेख (देवळेकर) पाटकर (वय ५५, सध्या रा. घाणेखूंट गवळवाडी, मूळ रा. मुरगिरी, ता. पाटण, जि. सातारा) अशी झाली आहे. सकाळी ७.३० वाजण्याच्या आधी, मौजे घाणेखूंट येथील वनिता ठसाळे यांच्या मालकीच्या पडीक घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, ते शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू नोंद क्र. ७५/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १९४ अंतर्गत खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने घाणेखूंट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.