(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेतकरी रघुनाथ गुरव यांची दुभती गाय शेतात पडलेल्या तुटक्या विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन मृत्यूमुखी पडली. ही घटना आज (सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५) रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गुरव आपली जनावरे चारण्यासाठी शेतात घेऊन गेले असता, विद्युत प्रवाह सुरू असलेली तुटकी तार शेतात पडलेली होती. दुर्दैवाने गायीने ती तार स्पर्श करताच काही क्षणांत तिचा मृत्यू झाला. या अपघाताच्या वेळी गायची दोरी मुलगा विनायक यांच्या हातात होती, परंतु नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात या धक्क्यातून बचावले. विजेच्या तारांच्या वेळेवर दुरुस्तीसंदर्भात महावितरण सतत निष्काळजीपणा करत असल्याने असे अपघात वारंवार घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. पशुधन, पिके किंवा कधीकधी मानवजीवही या दुर्लक्षाचा बळी ठरतात. तार तुटून प्रवाह सुरू असताना शेतात पडलेली असावी, मग महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याची खबरदारी का घेतली नाही? देखभाल व तपासणी कितपत नियमित केली जाते? शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
या घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ग्रामस्थांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, महावितरणने तातडीने जबाबदारी निश्चित करून शेतकऱ्यांचे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देखील केली जात आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार
काही महिन्यांपूर्वी निवळी येथे तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन दोन निष्पाप जीव गेले. कुटुंब उद्ध्वस्त झाले. निवळी येथील घटना ताजी असतानाच आता पुन्हा नेवरे येथे दुभती गाय शॉक लागून मृत्यूमुखी पडली. या अपघातात माणसाचे जीव गेला नाही, हीच दिलासा देणारी गोष्ट ठरली परंतु या घटनेने पुन्हा जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. आणखी किती निरपराध जीव गमावले की महावितरणचे अधिकारी जागे होतील? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
…तर हे बळी गेले असते का?
दरवेळी घटनेनंतर कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल होतात, पंचनामा करतात, पण जीव गेल्यावर दाखवायचा औपचारिक खटाटोप शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखाच ठरतो. तुटलेल्या तारांची देखभाल, नियमित तपासणी, जुने खांब व लाईन्स बदलणे या मूलभूत जबाबदाऱ्या महावितरणने वेळेवर पार पाडल्या असत्या तर हे बळी गेले असते का? जीवितहानी झाल्यानंतरही विजेच्या तारा सुरक्षेचा मुद्दा कायम दुर्लक्षित राहतो, हे वास्तव अधिकच अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे आता तरी महावितरणने केवळ कागदी दिलासे न देता प्रत्यक्ष उपाययोजना करून ठोस जबाबदारी पार पाडावी, अशी मागणीही केली जात आहे.

