(खेड)
तालुक्यातील मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतसंस्थेकडे गहाण ठेवलेले फ्लॅट परस्पर दुसऱ्याच फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवत संस्थेचा विश्वासघात केल्याप्रकरणी सुनील प्रभाकर सागवेकर (रा. भरणे, खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल भिकाजी विचले यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक २८ फेब्रुवारी २०१४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडली. सागवेकर यांनी त्यांच्या मालकीच्या समर्थनगर, भरणे येथील ‘सिद्धिविनायक निकेतन’ या इमारतीतील ‘अ’ विंगमधील तळमजल्यावरील सदनिक क्रमांक ए-०१, ए-०२ आणि ए-०३ या पतसंस्थेकडे गहाण ठेवून कर्ज घेतले होते. मात्र, त्याच मालमत्ता त्यांनी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड, चिपळूण येथेही गहाण ठेवत पतसंस्थेचा विश्वासघात केला. या व्यवहारासाठी वापरण्यात आलेली गहाणखते क्रमांक १९७८/२०१६ आणि १२१८/२०१६ असून, या दुहेरी गहाण व्यवहारामुळे संस्थेला सुमारे २५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी २० जून २०२५ रोजी सायंकाळी ५.४६ वाजता सागवेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलिसांकडून या फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सहकारी बँकिंग क्षेत्रात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.