(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील आश्रमशाळा आणि मदरशांमधील बालकांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते.
ही मोहीम १५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हाती घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील सुमारे २ हजार बालकांना लसीकरण दिले जाणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षित आरोग्य अधिकारी, सेविका, सहाय्यक, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच स्वयंसेवी कार्यकर्त्यांची पथके कार्यरत राहणार आहेत.
गोवर-रुबेला आजार निर्मूलनाच्या दृष्टीने ही मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेत १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी सक्रिय सहकार्य करणे आवश्यक आहे. कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले.

