(पुणे)
मुंढवा-केशवनगर परिसरातील नागरिकांना दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार रविवारी पहाटेच दौऱ्यावर गेले होते. सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी उड्डाणपुलाच्या कामाची आणि वाहतुकीच्या व्यवस्थेची तपासणी केली. यावेळी वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
पाहणीदरम्यान स्थानिक महिलांनी थेट अजित पवारांना प्रश्न विचारत आपला संताप व्यक्त केला. याचवेळी एका महिलेनं गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख करत, “पर्रीकर वाहतूक कोंडी पाहण्यासाठी दिवसा अचानक फिरायचे, तुम्हीही तसं करावं” अशी सूचना केली. त्यावर पवारांनी “पर्रीकर कोण?” असा प्रतिप्रश्न केला. त्यांच्या या प्रतीप्रश्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
महिलेने लगेचच स्पष्ट करत सांगितले, “गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जसे अचानक फिरायचे, तसेच तुम्हीही दिवसा येऊन स्वतः परिस्थिती बघा. आम्हाला यासाठी प्रश्न विचारू नका, उत्तर द्या.”
यावर अजित पवार म्हणाले, “मी प्रश्न विचारायला नाही आलो, तर इथल्या समस्या सुटाव्यात म्हणून आलो आहे. हा भाग पीएमआरडीए आणि महापालिका यांच्या वादामुळे अडकून पडला आहे. तरीही अधिकाऱ्यांना लगेच बोलावून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.”
नागरिकांनी या वेळी रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची टंचाई आणि बिल्डरांकडून मूलभूत सुविधा न मिळाल्याबाबत तक्रारी मांडल्या. पाणीपुरवठा प्रश्नावर पवारांनी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन करून त्वरित घटनास्थळी बोलावले. तसेच, “बिल्डर नागरिकांना सुविधा देत नसतील तर त्यांचे काम थांबवले जाईल” असा इशाराही त्यांनी दिला.

