(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शेअर मार्केट ट्रेडिंगमधून अल्पावधीत भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ठाण्यातील एका तरुणाने रत्नागिरीतील पिता–पुत्राला तब्बल ९० लाखांहून अधिक रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक ४ नोव्हेंबर २०२४ ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे.
फैजान नुरुद्दीन शेख (वय २५, सध्या रा. अमृतनगर, जि. ठाणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महमद अवाद अजीज वागळे (वय २१, रा. ओसवालनगर, रत्नागिरी) यांनी शनिवार, १८ एप्रिल रोजी फिर्याद नोंदवली. फिर्यादीतील माहितीनुसार, आरोपी फैजान शेख याने शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत पिता–पुत्राला जाळ्यात ओढले. त्याने चार महिन्यांच्या विशेष गुंतवणूक योजनेचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. या भुलथापांना बळी पडत संबंधितांनी टप्प्याटप्प्याने तब्बल ९० लाख १ हजार ३०० रुपये ऑनलाइन माध्यमातून गुंतवले.
मात्र, अपेक्षित परतावा तर दूरच; गुंतवलेली मूळ रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. सतत पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३१८ (२) व ३१८ (४) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. वाढत्या ऑनलाइन गुंतवणूक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

