(मुंबई)
सध्या राज्यात जोरदार चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता राजकारणातही उमटू लागले आहेत. भोंदू बाबा अशोक खरातला ‘गुरू’ मानणे रूपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.
खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर चाकणकर यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत होता. विरोधी पक्षांसह पक्षांतर्गत काही गटांकडूनही त्यांना पद सोडण्याची मागणी होत होती. अखेर त्यांनी दोन्ही पदांचा राजीनामा देत या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
निष्पक्ष तपासाची मागणी
रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, अशोक खरात प्रकरणातील कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात त्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. तपासातून सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे पारदर्शक व निष्पक्ष चौकशीची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात माझा दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.
फोटो व्हायरल झाल्यानंतर वाढली टीका
अशोक खरातवर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले. याच पार्श्वभूमीवर चाकणकर आणि खरात यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच पूर्वीच्या काही प्रकरणांत त्यांनी हस्तक्षेप केल्याच्या चर्चाही रंगल्या.
सुनेत्रा पवारांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात मांडली भूमिका
रूपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा.” राजीनाम्यासोबतच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही सर्व परिस्थिती वेदनादायक असल्याचे नमूद केले.
अडचणी वाढण्याची शक्यता
रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या ‘शिवनिका’ ट्रस्टच्या संचालिका होत्या, ही बाबही वादाच्या केंद्रस्थानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ट्रस्टशी संबंधित व्यक्तींवरही तपासाची टांगती तलवार आहे.
या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

