(मुंबई)
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (LC) मिळालेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार, मूळ कागदपत्रे उपलब्ध नसली तरी विद्यार्थ्यांचा अकरावीतील प्रवेश निश्चित करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली नियमित गुणवत्ता यादी 29 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील अनेक शाळांनी अद्याप विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला दिलेला नसल्याने प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती.
ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने महाविद्यालयांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होताच ती सादर करण्यात येतील, असे हमीपत्र (Undertaking) घेऊन त्यांचा प्रवेश निश्चित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गुणपत्रक-एलसी नसले तरी प्रवेश नाकारता येणार नाही
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, केवळ मूळ गुणपत्रक किंवा शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नाही म्हणून कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जाऊ नये. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा आणू नये, असेही सांगण्यात आले आहे.
डिजिलॉकरमधून उपलब्ध होणार गुणपत्रक
आधार व्हेरिफाइड विद्यार्थ्यांची दहावीची गुणपत्रके डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपातील गुणपत्रकाचा वापर करता येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित कालावधीत महाविद्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे. संबंधित कागदपत्रे वेळेत जमा न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना आणि पालकांना करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्यातील हजारो विद्यार्थी अद्याप कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असल्याने या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवेश प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

