(बंगळूरू)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) नोव्हेंबरमध्ये भारतीय हवाई दलाला दोन तेजस मार्क-१ए लढाऊ विमाने सुपूर्द करणार आहे. एचएएलला अलीकडेच अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेसकडून एक जेट इंजिन मिळाले असून, दुसरे इंजिन या महिन्याच्या अखेरीस येणार आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये केंद्र सरकारने ८३ तेजस मार्क-१ए विमानांसाठी एचएएलसोबत ४८,००० कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र अमेरिकन इंजिनांच्या वितरणातील विलंबामुळे डिलिव्हरी लांबली. आता २०२८ पर्यंत सर्व ८३ विमाने हवाई दलाला देण्यात येतील.
तेजस मार्क-१ए ही विमानाची प्रगत आवृत्ती असून त्यात सुधारित एव्हियोनिक्स आणि रडार सिस्टीम बसवण्यात आल्या आहेत. या विमानातील ६५% पेक्षा जास्त उपकरणे भारतातच तयार केली जातात.
सरकारने नुकतेच ९७ नवीन एलसीए मार्क-१ए खरेदीसाठी ६२ हजार कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे हवाई दलाच्या मिग-२१ ताफ्याची जागा घेण्यात मदत होईल. ६२ वर्षे सेवा दिल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मिग-२१ विमाने निवृत्त होणार आहेत.
‘मेक-इन-इंडिया’चा मोठा टप्पा
एलसीए मार्क-१ए हे ‘मेक-इन-इंडिया’ आणि भारताच्या एरोस्पेस क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ही विमाने राजस्थानमधील बिकानेरच्या नल एअरबेसवर तैनात करण्याची योजना आहे.

