(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली असून, त्यांच्याशी संबंधित प्रकरण दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आले आहे. दोघांना जामीन मिळण्यात हेतुपुरस्सर विलंब केला जात असल्याचा आरोप पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. या दोघांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिवाळीपर्यंत कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवावा, असे भावनिक आवाहन करत दिपके यांनी आंदोलन काही काळासाठी थांबवण्याचे संकेत दिले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने १० ऑक्टोबर रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशुतोष रांका, सौरभ दास आणि अभिजीत दिपके यांना विमानातच अटक करण्यात आली. त्यानंतर आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जंतर-मंतर येथे झेंडा फडकवण्याच्या प्रकरणात पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. याच्या निषेधार्थ पक्षाने कनॉट प्लेस येथे तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी पोलिसांनी दिपके यांना ताब्यात घेतले; मात्र दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली.
आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्याविरोधात कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच संसद मार्ग पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आल्याने पक्षाच्या पुढील आंदोलनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दोघांना जामीन मिळण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असून, त्यांच्या सुनावणीत अडथळे आणले जात असल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे.
या प्रकरणात कायदेशीर मार्गाने पुढे जाण्यासाठी दिपके वकिलांचा सल्ला घेत आहेत. शनिवारी त्यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा केली. रविवारपर्यंत आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची सुटका झाली नाही, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. रविवारीही त्यांनी दोघांच्या सुटकेची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले. त्यांची सुटका झाल्यानंतरच आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आज (मंगळवारी) इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिपके आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या आठवणींनी भावुक झाले. आंदोलनाला पुढे नेण्यात या दोघांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगून त्यांच्या धैर्याचे आणि निष्ठेचे त्यांनी कौतुक केले. “मी केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करत होतो; प्रत्यक्षात हे आंदोलन आशुतोष आणि सौरभ यांनीच पुढे नेले आहे. त्यांनी ज्या धैर्याने आणि विश्वासाने आंदोलनाचे नेतृत्व केले, त्यातूनच मला बळ मिळाले,” असे दिपके म्हणाले.
आंदोलनादरम्यान तुरुंगवासाच्या शक्यतेबाबत तिघांमध्ये अनेकदा चर्चा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोण किती दिवस तुरुंगात राहू शकेल, यावर त्यांच्यात गमतीशीर संवाद व्हायचा. सौरभ दास तुरुंगात एक दिवसही राहू शकणार नाही, अशी त्यांची थट्टा केली जात होती; मात्र आज सौरभ यांनी स्वतःला सिद्ध केले आहे, अशी आठवण दिपके यांनी सांगितली.
आंदोलनामुळे कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करत दिपके यांनी दिवाळीपर्यंत कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे आवाहन केले. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या कुटुंबीयांप्रमाणेच इतर कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही चिंता वाटत असेल, असे ते म्हणाले. त्यामुळे सणाच्या काळात कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यावा, असे त्यांनी सांगितले.
जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या वेळीच पुढील काळात परिस्थिती अधिक कठीण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता, असे दिपके यांनी नमूद केले. आंदोलन करू दिले जाणार नाही, खटल्यांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न होईल, असे आपण तेव्हाच सांगितले होते. आता त्याच प्रकारच्या कारवाया होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीतही अनेक सीजेपी कार्यकर्ते संघटितपणे लढत राहिले, याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.
सीजेपीच्या आंदोलनाची तुलना फ्रान्समधील हिंसाचाराशी करणाऱ्यांवरही दिपके यांनी टीका केली. दोन्ही देशांतील परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी हिंसेचा मार्ग न स्वीकारता करुणा आणि शांततेचा मार्ग निवडल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक स्वरूप देणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
कोणत्याही कारवाईला किंवा दबावाला न घाबरता महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांनुसार आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला. देशवासीयांनी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या त्यागाची आठवण ठेवावी, असे आवाहन करत त्यांच्या कुटुंबीयांकडूनच सध्या आपल्याला सर्वाधिक प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील द्वेष संपवण्याचे आवाहन करत गांधीवादी मार्गानेच पुढील लढा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


