( पंढरपूर )
श्री क्षेत्र पंढरपूर येथे उद्या २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल होत असून, शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे.
दर्शनासाठी काल रात्री गोपाळपूर येथील नवव्या पत्राशेडपर्यंत लांबलचक रांगा लागल्या आहेत. काही भाविकांना देवदर्शनासाठी १५ ते १८ तास प्रतीक्षा करावी लागत असूनही, उत्साहात किंचितही कमी नाही. लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध भाविकही ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’च्या जयघोषात दर्शनरांगेत उभे आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने चोख व्यवस्था केली आहे. मंदिर समितीने दर्शनासाठी २४ तास मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला असून, अखंड दर्शन सोहळा प्रक्षाळपूजेपर्यंत सुरू राहणार आहे. दर्शनासाठी १४ पत्राशेड उभारण्यात आली आहेत. प्रत्येक भाविकाला देवाचे दर्शन मिळावे, यासाठी प्रशासन आणि मंदिर समिती सतत प्रयत्नशील आहे.
यंदाच्या यात्रेसाठी भाविकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ११५० जादा बसेस सोडण्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “कार्तिकी यात्रेकरूंना सोयीस्कर प्रवासासाठी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान या बसेस विविध मार्गांवर धावतील.” या बससेवा ‘चंद्रभागा’ बसस्थानकातून सुरू करण्यात आल्या आहेत.
तसेच, मध्य रेल्वेने एकूण ३६ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान मिरज–लातूर आणि सोलापूर–मिरज या मार्गांवर या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. रेल्वेच्या या सेवेमुळे यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.
पंढरपूरात सर्वत्र ‘विठू माऊली’च्या जयघोषात भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या वर्षीची कार्तिकी एकादशी यात्रा विशेष जल्लोषात पार पडण्याची अपेक्षा आहे.

