(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मृत व्यक्तीच्या उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका ४७ वर्षीय मासेमारी करणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना गावडेआंबेरे-कापुसतळी येथे घडली. या हल्ल्यात रविंद्र रामा लाकडे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, आरोपीने त्यांच्या उजव्या गालाचा चावा घेतल्याची तक्रार आहे. याप्रकरणी नितीन बाबल्या डोर्लेकर (रा. गावडेआंबेरे-कापुसतळी, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रविंद्र लाकडे हे घरी जात होते. त्यावेळी नितीन डोर्लेकर याने त्यांच्याकडे मृत रत्नाकांत रामचंद्र नाटेकर यांच्याकडील उधारीचे पैसे मागितले. त्यावर नाटेकर यांचे निधन झाले असून, त्यांच्या कार्याच्या दिवशी येऊन उधारीचे पैसे घ्यावेत, असे लाकडे यांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या उत्तराचा राग आल्याने डोर्लेकर याने त्याच्याकडील कोयता लाकडे यांच्या दिशेने फेकून मारला. हा कोयता त्यांच्या डोक्याला लागल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने धावत येऊन त्यांच्या उजव्या गालाचा चावा घेतला.
तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


