(बरेली)
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या बरेलीतील घरावर उशिरा रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून स्वीकारली आहे.
व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये संत प्रेमानंद महाराजांचा “अनादर” झाल्याचा आरोप करत हा हल्ला करण्यात आल्याचे नमूद आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “दिशा पटानी यांच्या घरावर झालेला गोळीबार आम्ही केला आहे. हे फक्त ट्रेलर होते. पुढच्या वेळी धर्माचा अपमान करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील.”
धमकीपर संदेशात पुढे म्हटले आहे की, धर्म आणि संतांचा अपमान सहन केला जाणार नाही. भविष्यात जर कोणी अशा प्रकारे अनादर केला तर त्याच्या घरात कोणीही टिकणार नाही, अशी उघड धमकी देण्यात आली आहे.
घटनेनंतर पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. घराबाहेरून रिकाम्या काडतुस जप्त करण्यात आल्या आहेत. तपास गुन्हे शाखेकडे सोपवला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दरम्यान, दिशा पटानी यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि गोल्डी ब्रार टोळीविरोधात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

