(पुणे)
पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क–मुंढवा परिसरातील ४० एकर जमीन विक्री प्रकरणात नवा वाद उफाळून आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. पुण्यातील या कथित जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, मात्र राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
विजय कुंभार यांनी सांगितले की, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा जमीन व्यवहार सुरू असून एकाच नोटरी वकिलामार्फत कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. २५ मे २०२१ रोजी हा व्यवहार करण्यात आला असून, यासंबंधीची सर्व कागदपत्रे सरकारकडे उपलब्ध आहेत. याआधी पार्थ पवार यांच्या सहीचे पत्र समोर आल्यानंतर त्यांनी ती सही आपली नसल्याचे सांगितले होते. मात्र, या व्यवहाराची पूर्ण माहिती अजित पवार यांना होती आणि मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री या प्रकरणात संरक्षण देत असल्याचा खळबळजनक दावा कुंभार यांनी केला.
अंजली दमानिया यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, ही पॉवर ऑफ अटॉर्नी मुंढव्याच्या जमिनीसंदर्भातील असून प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही आणि फोटो आहे. २०२१ मधील ही कागदपत्रे अॅडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी पाठवली असून, दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांकडूनही संबंधित कागदपत्रे आली आहेत. या प्रकरणात चॅटिंगचे पुरावेही असून संतोष हिंगणे, तृप्ता ठाकूर तसेच अजित पवारांचे पीए यांच्यातील संभाषणांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे सर्व पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले असतानाही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
या व्यवहारात शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांचा थेट संबंध असून, तीन ओएसडी सहभागी असल्याचा दावाही त्यांनी केला. केवळ दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावरच कारवाई होत असून पार्थ पवार यांना वगळले जात असल्यामुळेच ही कागदपत्रे बाहेर आली असल्याचे दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानिया यांनी इशाराही दिला की, जर अजित पवार यांचा राजीनामा घेण्यात आला नाही, तर आम्ही पुण्यात जाऊन अधिक तीव्र आंदोलन करू. या प्रकरणात याचिका दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रथम जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

