(मुंबई)
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर आणि सात जणांच्या अटकेनंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील अॅड. असीम सरोदे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले असून, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“रेव्ह पार्टी नव्हे, खासगी समारंभ” – सरोदे यांचा दावा
अॅड. सरोदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुणे पोलिसांनी खासगी पार्टीला ‘रेव्ह पार्टी’चं स्वरूप देऊन चुकीचा प्रतिमा निर्माण केली. ते म्हणाले, “रेव्ह पार्टी म्हणजे मोठा संगीत आवाज, गर्दी आणि अमली पदार्थांचा मुक्त वापर. परंतु येथे सात जण बंद घरात बिअर आणि दारू घेत होते. घरात दारू पिणं हा गुन्हा नाही. तरीही राजकीय हेतूने ही संपूर्ण घटना खोट्या पद्धतीने सादर करण्यात आली.” सरोदे यांनी कोकेन पुराव्याबाबतही थेट पोलिसांवर आरोप करत म्हटले, “प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत हे लक्षात घेऊनच त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. पोलिसांनी दोन ग्रॅम कोकेन सापडल्याचा दावा केला, पण जामीन मिळू नये म्हणून त्यात सात मिलिग्रॅम कोकेन वाढवून दाखवण्यात आलं. म्हणजेच, पुरावे ‘प्लँट’ करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण ‘दृश्यम’ चित्रपटासारखं रचलं गेलं आहे.”
अॅड. सरोदे यांनी पोलिसांनी कारवाईचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करून संशयितांची जनसमोर बदनामी केल्याचा आरोप केला. “न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वीच आरोपींना गुन्हेगार ठरवून समाजात बदनामी केली गेली. यामुळे व्यक्तीच्या खासगी जीवनाच्या हक्कांचं गंभीर उल्लंघन झालं आहे. पोलिस यंत्रणांचा वापर राजकीय सूडासाठी होतो आहे. हे थांबायला हवं. या प्रकरणात फक्त कायदेशीरच नाही तर नैतिक पातळीवरही पोलिसांकडून चुकीचं वर्तन झालं आहे. प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यास पुणे पोलिसांची अडचण होऊ शकते,” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी रोहीणी खडसे आणि आमदार रोहित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेण्याची योजना आखली होती. मात्र दौरा रद्द करून रात्री आठच्या सुमारास रोहीणी खडसे एकट्याच आयुक्तालयात दाखल झाल्या. त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांची भेट घेऊन प्रकरणाच्या पारदर्शक तपासाची मागणी केली. उपायुक्त पिंगळे यांनी सांगितले की, “गुन्ह्याचा तपास कोणताही पक्षपात न करता, निष्पक्ष आणि कायद्यानुसार केला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री दिली आहे.”
पुणे पोलिसांनी एका घरात तथाकथित रेव्ह पार्टीवर धाड टाकून डॉ. प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना अटक केली. या कारवाईत दोन ग्रॅम कोकेन जप्त झाल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र, अॅड. असीम सरोदे यांनी हा पुरावा पोलिसांनीच मुद्दाम ‘प्लँट’ केल्याचा आरोप करून प्रकरणाला राजकीय कारस्थान असल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. राजकीय सूड व पोलिसी मनमानीवरून आता हे प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

